चंद्रपूर वन अकादमी येथे व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांची प्रादेशिक बैठक झाली. (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur Tiger Project | चंद्रपुरात मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांची प्रादेशिक बैठक

व्याघ्र संवर्धन व अधिवास टिकवण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Central India Tiger Conservation Directors Meeting

चंद्रपूर : मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांची प्रादेशिक बैठक काल १ व आज २ जुलै रोजी चंद्रपूर येथील चंद्रपूर वन अकादमी येथे यशस्वीपणे पार पडली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांतील १९ व्याघ्र प्रकल्पांचे वरिष्ठ वन अधिकारी सहभागी झाले होते. व्याघ्र संवर्धनातील सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि अधिवास टिकवण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाला राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे अतिरिक्त महासंचालक व सदस्य सचिव डॉ. गोबिंद सागर भारद्वाज, महानिरीक्षक, वन डॉ. संजयन कुमार, सदस्य (NTCA) राहुल भटनागर, आणि सहायक महानिरीक्षक, मध्य भारत क्षेत्राचे नंदकिशोर काळे उपस्थित होते. दोन दिवशीय बैठकीत व्याघ्र संवर्धनातील सध्याची स्थिती, व्यवस्थापनातील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली.

पहिल्या दिवशी विविध व्याघ्र प्रकल्पांनी M-STRIPES डेटा सादर केला. आगामी अखिल भारतीय व्याघ्र गणना (AITE) २०२६, फेज-४ मॉनिटरिंग, व्याघ्र मृत्यू अहवाल, TCPs, तसेच SPARSH पोर्टलद्वारे वार्षिक कार्ययोजना सादरीकरण, गावांचे पुनर्वसन, आणि MEE मूल्यांकन यावर सविस्तर चर्चा झाली. काही प्रकल्पांनी तण नियंत्रण व कुरण व्यवस्थापन यामधील नवोपक्रम सादर केले. दुपारी, प्रतिनिधींनी ताडोबा प्रकल्पात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही पाहिले.

आज बुधवारी दुसऱ्या दिवशी, सर्व १९ व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक आणि उपसंचालक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभव, आव्हाने आणि स्थानिक उपाययोजना सादर केल्या. या अनुभव विनिमयातून एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळाली आणि व्याघ्र संवर्धनासाठी नवीन प्रारूपांची जुळवाजुळव करण्यात आली.

बैठकीच्या समारोप प्रसंगी डॉ. गोबिंद सागर भारद्वाज यांनी, आंतरराज्य समन्वय, गुप्तचर यंत्रणा बळकट करणे, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धती अंगीकारणे, आणि विकेंद्रीत अंमलबजावणी या मुद्द्यांवर भर दिला. त्यांनी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिवास सुधारणा, आक्रमक वनस्पती नियंत्रण, शाश्वत कुरण विकास आणि समुदाय-समावेशक उपाययोजना यांचे महत्त्व अधोरेखित केले. बैठकीनंतर उपस्थित प्रतिनिधींनी अटल बिहारी वाजपेयी वनौद्यान, विसापूर येथे भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT