चंद्रपूर : चंद्रपूर भाजपचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयानंतर पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात असंतोषाचा अध्याय संपल्याची प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याची घटना घडल्याचे सम्मोर आले आहे. पक्षातील संघटनात्मक शिस्त आणि प्रदेश नेतृत्वाचा सन्मान राखल्याच्या कारवाईने कार्यकर्त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना प्रदेश नेतृत्वाचा अवमान केल्याच्या कारणावरून तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवार यादीत कासनगोट्टुवार यांनी परस्पर बदल करून दहापेक्षा अधिक उमेदवार बदलल्याने पक्षाने हे प्रकरण गंभीरपणे घेत कारवाई केली होती.
या निर्णयाचे तीव्र पडसाद शहरातील तुकूम प्रभागात उमटले. पक्षातील नाराज आणि दुखावलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या कारवाईचे स्वागत करीत फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी ‘पक्षशिस्तीचा सन्मान राखला गेला’ अशी भावना व्यक्त करीत या निर्णयामुळे पक्षातील वादग्रस्त नेतृत्वाला चाप बसल्याचे समाधान व्यक्त केले.
वर्षभरापूर्वीच त्यांची महानगराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांच्या कार्यशैलीला पक्षांतर्गत विरोध होता. त्यांच्या वादग्रस्त निर्णयपद्धती आणि कार्यपद्धतीमुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले होते. निवडणुकीच्या काळात उमेदवार यादी बदलल्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक ठरला होता. कार्यकर्त्यांनी ‘हा निर्णय निष्ठावंतांच्या भावनांचा विजय आहे’ असे म्हणत, या कारवाईने पक्षात नवी ऊर्जा संचारल्याची भावना व्यक्त केली.
कासनगोट्टुवार यांच्या हकालपट्टीने भाजपमधील अंतर्गत वादावर पडदा पडला असून, या निर्णयाने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये समाधान आणि जल्लोषाचे वातावरण आहे. महापालिका निवडणुकीत या नव्या ऊर्जेचा पक्षाला फायदा होईल, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
‘आम्ही पक्षासाठी राबतो, पण काहींच्या कार्यपद्धतीने आम्हाला न्याय मिळत नव्हता. आज योग्य निर्णय झाला,’ असे एका कार्यकर्त्याने सांगितले. तर दुसऱ्याने ‘पक्षशिस्त आणि प्रदेश नेतृत्वाचा सन्मान हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तो आज राखला गेला, याचा अभिमान आहे,’ असे म्हटले.