चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील कारगिल चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली Pudhari
चंद्रपूर

Chandrapur WCL Protest | वेकोलित नोकऱ्यांच्या मागणीसाठी पदयात्रा; आ.बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा

विनापरवानगी आंदोलन आणि पोलिसांविरोधात धमकीवजा वक्तव्यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

MLA Bachchu Kadu Chandrapur

चंद्रपूर : वेकोलिमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या विनापरवानगी पदयात्रा आणि त्यानंतर झालेल्या सभेतील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, पोलिसांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि धमकीवजा वक्तव्ये केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

सहा जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा

आमदार बच्चू कडू यांच्यासह शिवसेना (शिंदे गट)चे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र संघटक मुकेश जीवतोडे, रोशन हरबडे, अमोल मांढरे, नथ्थू नवले आणि सतीश बीडकर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १९०, १९१(२), २९६, २२३, २२४ आणि ३५१(२), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

साखरा ते घुग्घुस पदयात्रा; त्रिशूल आंदोलनही

१८ ऑक्टोबर रोजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील साखरा येथून चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील कारगिल चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलिमध्ये ८० टक्के नोकऱ्या देण्यास प्राधान्य मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी 'त्रिशूल आंदोलन'ही करण्यात आले. या आंदोलनासाठी आवश्यक कायदेशीर पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती, असा आरोप पोलिसांनी केला आहे. विनापरवानगी जमाव जमवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.

सभेतील वक्तव्यांवरून वाद

कारगिल चौकातील सभेला संबोधित करताना बच्चू कडू यांनी, वेकोलि व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनावर आरोप केले. वेकोलिने प्रशासनाला विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविषयी कथितरीत्या अश्लील भाषेचा वापर करून धमकीवजा वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पाठविल्यास त्यांना पुलाखाली फेकून देऊ, अशा आशयाचे वक्तव्य सभेत करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कथित वक्तव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस बॉईज संघटनेचा निषेध; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

गणेशोत्सवापासून नवरात्रीपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस कर्तव्य बजावले. अशा परिस्थितीत पोलिसांविरोधात कथितरीत्या असभ्य भाषेचा वापर करण्यात आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलीस बॉईज संघटनेने तीव्र निषेध नोंदविला आहे. या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून, त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येणार आहेत.

वेकोलिमधील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित वक्तव्यांवरून आता हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह स्थानिक नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT