चंद्रपूर : ब्रह्मपुरी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत ऐतिहासिक विजय नोंदवला असून या विजयाच्या आनंदात काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शहरात ठेका धरत विजय जल्लोष साजरा केला. २३ सदस्यीय नगरपरिषदेत काँग्रेसने तब्बल २१ जागा जिंकत भाजपचा धोबीपछाड केला. नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे उमेदवार योगेश मिसार विजयी झाले आहेत.
निकाल लागताच शहरात जल्लोष, ठेका धरत कार्यकर्त्यांत मिसळले वडेट्टीवार
मतमोजणीचा निकाल हाती येताच ब्रह्मपुरीत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व स्पष्ट झाले. त्यानंतर शहरातून भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी विजयी उमेदवार व शेकडो कार्यकर्त्यांसह ठेका धरत, नाचत आपला आनंद व्यक्त केला. रस्त्यावर उतरत कार्यकर्त्यांसोबत नाचताना पाहून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपच्या गडाच्या अपेक्षांना जोरदार धक्का
विशेष म्हणजे, काही माजी काँग्रेस समर्थकांना भाजपने मुंबईत पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर ब्रह्मपुरीत भाजप निर्विवाद सत्ता मिळवेल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निकालात काँग्रेसने २३ पैकी २१ जागा जिंकत भाजपच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले. भाजपला केवळ एक तर घड्याळ चिन्हाला एकच जागा मिळाली.
मतदारांचे आभार; विश्वासाला सन्मान
विजय मिरवणुकीदरम्यान आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारांचे आभार मानत, “ब्रह्मपुरीच्या जनतेने काँग्रेसवर दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी जबाबदारी वाढवणारा आहे. हा विजय कार्यकर्ते आणि मतदारांचा आहे,” असे सांगितले. ब्रह्मपुरी नगरपरिषद निवडणुकीतील या निकालामुळे विजय वडेट्टीवार यांचा गड अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ठेका धरत साजरा केलेला हा विजय केवळ उत्सव नव्हे, तर ब्रह्मपुरीच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व अधिक बळकट करणारा ठळक संदेश देणारा ठरला आहे.