चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या ५ मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मुलांचे मृतदेह तासभरानंतर नागभिड पोलिसांनी शोधून काढले . मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत. त्यानंतर गावंडे कुटूंबियांच्या स्वाधीन केले जाणार आहे. आज शनिवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. (Chandrapur News)
जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे (रा. साटगाव कोलारी (ता.चिमूर)अशी मृतांची नावे आहेत. गावंडे कुटूंबियावर शोककळा पसरली आहे. (Chandrapur News)
या घटनेची माहिती सगळीकडे पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या परिसरातील ढिवर बांधवांच्या मदतीने मृतदेहांसाठी शोध मोहीम राबविण्यात आली. अवघ्या तासभरात खोल खड्यात एकाच ठिकाणी पाचही मुलांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी ताब्यात घेतले.
मृतदेह ग्रामीण रूग्णालय नागगभीड येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत. त्यानंतर ते मृतकांच्या कुटुंबियांना देण्यात येतील. या घटनेची माहिती साटगाव कोलारी गावात पोहचताच शोककळा पसरली. पाच मृतांमध्ये चार जण एकट्या गावंडे कुटुंबातील आहेत. त्यामध्ये जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे हे दोन सस्ख्ये भाऊ होते. तर एका मित्राचा समावेश आहे.