Honey Bee Attack  Pudhari file Photo
चंद्रपूर

Bee attack : मधमाशांच्या हल्ल्यात शेतमजूर पतीचा मृत्यू; पत्नी जखमी!

शेतात निंदण काढताना अचानक मधमाशांनी केला हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: खरीप हंगामातील शेतकामासाठी गेलेल्या पती-पत्नीवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची दुर्दैवी घटना सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील शेतात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पती महिपाल कचरू येरमा (५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी शालू महिपाल येरमा (५०) जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे व्याहाड खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महिपाल येरमा आणि त्यांची पत्नी शालू हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. महिपाल यांनी मनोहर डोंगरे यांची शेती ठेक्याने घेतली होती. सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतातील रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतात वाढलेले निंदण काढण्यासाठी महिपाल आणि शालू हे रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास शेतात गेले होते.

दोघेही शेतात निंदण काढण्याचे काम करीत असताना शेतालगतच्या झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातून अचानक मोठ्या संख्येने मधमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी पती-पत्नीवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांचीही तारांबळ उडाली. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मधमाशांचा हल्ला सुरूच राहिल्याने दोघांनी जवळच असलेल्या कालव्यातील पाण्यात डोके बुडवून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान महिपाल येरमा हे बेशुद्ध पडले. शालू यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

त्यांचा आवाज ऐकून राजोली चक येथील एक व्यक्ती तातडीने घटनास्थळी धावून आला. त्याने शालू यांच्या कुटुंबीयांशी मोबाइलवरून संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांची मुले घटनास्थळी पोहोचली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिपाल यांना तातडीने व्याहाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिपाल यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. शालू यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच महिपाल यांचा मृत्यू झाला. शालू यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उपचाराधीन आहे. खरीप हंगामातील शेतकामासाठी गेलेल्या शेतकरी कुटुंबावर अचानक मधमाशांच्या हल्ल्याने काळाचा घाला घातला. या दुर्दैवी घटनेमुळे व्याहाड खुर्द तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT