९० हजाराची लाच घेताना बल्लारपूरच्या तहसीलदाराला अटक 
चंद्रपूर

चंद्रपूर : ९० हजाराची लाच घेताना बल्लारपूरच्या तहसीलदाराला अटक

ट्रक्टर, जेसीबी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच; तलाठ्याचाही गुन्ह्यात समावेश

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : शेतातील माती मुरूम काढून शेतात लेव्हल करण्याकरीता २ ट्रक्टर व एका जेसीबीचा वापर करण्यात आला. बल्लारपूर येथील तहसीलदाराने शेतात जावून तक्रारदाराला ही कारवाई टाळण्यासाठी २ लाख २० हजाराची मागणी केली होती. त्यापैकी ९० हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने बल्लारपूरच्या तहसीलदाराला मंगळवारी (दि.१) रंगेहाथ अटक केली. तर या प्रकरणात सहभागी तलाठी रजेवर असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अभय अर्जुन गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तहसीलदाराचे तर सचिन रघुनाथ पुकळे असे तलाठ्याचे नाव आहे. या कारवाईने चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मौजा कोठारी, (ता. बल्लारपूर) येथील रहिवासी असून बिल्डींग मटेरिअल सप्लायरचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांची कवडजई साज्यात (ता. बल्लारपूर) येथे शेती आहे. ते २३ मार्च २०२५ रोजी २ ट्रक्टर व एका जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या शेतातील माती मुरूम काढून शेतातील लेवलींगचे काम करीत होते. दरम्यान कवडजई साजाचे तलाठी सचिन पुळके व तहसीलदार गायकवाड यांनी शेतात जावून मुरूम माती काढण्याचा परवाना नसल्याने २ ट्रक्टर व जेसीबी जप्त करण्याचा दम दिला. ही कार्यवाही टाळायची असेल तर तहसीलदारासाठी २ लाख व तलाठ्यायकरीता २० हजार अशी एकूण २ लाख २० हजाराच्या लाचेची मागणी केली. कार्यवाहीच्या धाकाने तक्रारदाराने १ लाख १९ हजार ९०० रुपये दिले व तहसीलदार व तलाठ्याने रक्कम स्विकारली. मागणी केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित १ लाख रुपये देण्यासाठी तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून २६ मार्च रोजी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी (दि.१) तडजोडीअंती ९० हजाराची लाच स्विकारताना सापळा रचून तहसिलदाराला अटक करण्यात आली. तसेच या गुन्हात सहभागी असणारा तलाठी गैरहजर असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पो हवा, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पो. अं. अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व सतिश सिडाम यांनी ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT