चंद्रपूर

चंद्रपुरात टोल नाक्यावर एक कोटीचा सुगंधी तंबाखू जप्त

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुर व अमरावती येथील दक्षता विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर टोल नाक्यावर मोठी कारवाई करून कोट्यवधींचा अवैध सुगंधी तंबाखू जप्त केला आहे.

माहिती माहितीनुसार नागपुर व अमरावती येथील दक्षता विभागाला (व्हिजीलांस) कर्नाटक राज्यातून चंद्रपूर मार्गे महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधी तंबाखू अवैधरीत्या विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुप्त माहितीची खात्री करून दक्षता विभागाने काल मंगळवारी सायंकाळपासून विसापूर टोल नाक्यावर सापळा रचला. रात्रीच्या वेळी कर्नाटक राज्यातून येणारे एम एच 25 यु 1211 व टी एस 07 यू ई 7208 हे दोन 12 चाकी ट्रक टोल नाक्यावर येताच दक्षता विभागाच्या चमूने त्यांना अडवून विचारपूस सुरू केली. सुरुवातीला दोन्ही ट्रक चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र मिळालेली खात्रीशीर माहिती आणि ट्रक मधुन येणारा सुगंधी तंबाखूचा वास ह्यावरून दक्षता विभागाची दोन्ही ट्रक मधुन अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची खात्री पटल्याने त्यांनी दोन्ही ट्रकच्या ताडपत्री उघडण्यास सांगितले. ट्रकची झडती घेतली असता त्यात अवैध सुगंधी तंबाखू आढळून आल्याने दोन्ही ट्रक तत्काळ ताब्यात घेऊन बल्लारपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे ट्रक मधे असलेल्या सर्व पोत्यांची तपासणी केली असता अंदाजे 1 कोटी 11 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा सागर नावाचा अवैध सुगंधी तंबाखू आढळून आला असुन अंतिम पडताळणीनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता नागपुर अन्न व औषधी प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध तंबाखू तस्कर बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू तयार करण्याचा कच्चा माल आणुन विषारी रसायनांचा वापर करून सुगंधी तंबाखू तयार करून विदर्भात सर्वत्र विक्री करतात अशी माहिती आहे. अशाच एका कारखान्यावर काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर पोलिसांनी कारवाई करून कारखाना उध्वस्त केला होता. गुजरात व कर्नाटक येथून मध्य प्रदेश येथील वाहतूक परवाना तयार करून अवैध सुगंधी तंबाखू चंद्रपूरसह विदर्भातील विविध ठिकाणी माल उतरवून सर्वत्र विक्री करण्यात येते. हे तस्कर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देण्यासाठी ट्रक व छोट्या मालवाहक गाड्या मध्ये पोहे, मुरमुरे, आलू चिप्स चे पॅकेट अशा विविध प्रकारच्या  वस्तूंच्या विक्रीच्या नावाने अवैध सुगंधी तंबाखूची तस्करी करतात. मात्र आजच्या घटनेने तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT