चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर. pudhari photo
चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा

Tirupati Balaji temple theft: पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून ठेवले बांधून

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सात सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर पुजाऱ्याला एका खोलीत बांधून ठेवले आणि मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड टाकून दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली. ही घटना शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या सशस्त्र दरोड्यामुळे शहरात मंदिर सुरक्षित नसल्याचे भाविकांमध्ये बोलले जात आहेत.

चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया हे मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आहे. अतिशय देखण्या या मंदिरात डिसेंबर महिन्यात नुकताच ब्रम्होत्सव सोहळा पार पडला. या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शन व पूजाअर्चा करण्यासाठी येतात.

दरम्यान शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. परिसर बघितला. तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली. त्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरे बंद केले. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्याला बंदुकीने धाक दाखवून दोन्ही हात बांधून एका खोलीत बांधून ठेवले. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले.

यावेळी सातही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.रात्री दोन वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याने घटनेची माहिती इतरांना दिली. बांधून ठेवलेल्या पुजाऱ्याची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव त्यांची संपूर्ण टीम घेऊन मंदिरात दाखल झाले. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT