Akapur Shivaar tiger issue
चंद्रपूर: ब्रह्मपुरी येथे आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एका कार्यक्रमासाठी आले असता, नागभीड तालुक्यातील आकापूर येथील नागरिकांनी वाघाच्या बंदोबस्तासाठी त्यांना साकडे घातले. मागील आठवडाभरापासून आकापूर परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू असून, या वाघाने आतापर्यंत एका शेतकऱ्याचा जीव घेतला आहे. अजूनही याच परिसरात भ्रमंती सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले आहेत.
मागील शुक्रवारी आकापूर येथील वासुदेव वेठे नावाच्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तो सायंकाळच्या सुमारास शेतात गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली. आणि त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह शेतात सापडला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला. संतप्त जमावाने अधिकाऱ्यांना घेराव घातला तसेच मृतदेह उचलण्यास नकार दिला. अखेर वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यासह नागरिकांच्या पाच मागण्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती शांत झाली आणि अंत्यसंस्कार पार पडले.
वनविभागाने परिसरात ट्रॅप आणि लाईव्ह कॅमेरे बसवून वाघाचा शोध घेण्यास सुरुवात केली. कॅमेऱ्यात वाघाच्या हालचाली दिसल्याही, मात्र बंदोबस्त करण्यात विभाग अपयशी ठरला. परिणामी ग्रामस्थांनी तळोधी वन कार्यालयावर धडक देऊन तीव्र आंदोलन केले आणि तातडीने वाघाला पकडण्याची मागणी लावून धरली.
आकापूर येथील घटनेला आता नऊ ते दहा दिवसांचा कालावधी उलटूनही वाघ अजून मोकाट आहे. या काळात वाघाने गावात घुसून एका कुत्र्यावर हल्ला केला, डुकरांची शिकार केली तसेच काल एका गाईला ठार केले. त्यामुळे भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
काल आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात साचलेल्या चिखलात लहान आणि मोठ्या आकाराचे वाघाचे पगमार्क (पावलांचे ठसे) आढळले असून नागरिकांनी परिसरात वाघासोबत वाघीण आणि बछडा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे दहशती वाढली आहे.
या भागातील शेतकरी सध्या धान कापणीच्या हंगामात आहेत. मात्र वाघाच्या भीतीमुळे कोणीही शेतात जाण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांसह काही शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली असली, तरी वनविभागाकडून वाघाचा बंदोबस्त होऊ शकला नाही.
या पार्श्वभूमीवर आज आकापूर येथील शेतकरी संघटनेते अध्यक्ष तुकाराम निकुरे, उपाध्यक्ष अमोल टी. भाकरे, सचिव प्रशांत भाकरे, मिलिंद भाकरे, अमोल पी. भाकरे आणि नागरिकांनी ब्रह्मपुरी येथे आलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी आकापूर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघ, वाघीण आणि बछड्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनी सांगितले की, “वनविभागाने योग्य पावले उचलली असती तर आतापर्यंत वाघाला पकडता आलं3 असते, परंतु वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाघ अजून मोकाट आहे आणि नागरिक दहशती जीवन जगत आहेत. आजही आम्ही भीतीच्या छायेत जगत आहोत.
या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून, वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या ग्रामस्थांनी आता थेट शासनाकडे धाव घेतली असून, महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून तातडीची कारवाई होणार का, याकडे आकापूरवासियांचे लक्ष लागले आहे.