Crime  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime| एमआयएम नगरसेवक अजहर शेख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; काँग्रेस नेत्यांवर कट रचल्याचा आरोप

जखमी नगरसेवकावर रुग्णालयात उपचार सुरू; शहरातील राजकीय वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात रविवारी मध्यरात्री 'एमआयएम'चे नगरसेवक अजहर शेख यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान माध्यमांशी बोलताना अजहर शेख यांनी काँग्रेस नगरसेविका सोफिया खान यांचे पती तवंगर खान, त्यांचे नातेवाईक तसेच काँग्रेसचे पराभूत उमेदवार सोहेल रजा यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील एमआयएमचे नगरसेवक अजहर शेख यांच्यावर मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील त्यांच्या मालकीच्या अरेबियन ताज या बिर्याणी हॉटेलमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजहर शेख हॉटेलमध्ये उपस्थित असताना अचानक १० ते १५ युवक तेथे आले. काहीही न बोलता त्यांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अजहर शेख जखमी झाले. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अजहर शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

उपचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना अजहर शेख यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, ते एकोरी प्रभागातून एमआयएमचे नगरसेवक असून, त्याच प्रभागातील काँग्रेस नगरसेविका सोफिया खान यांचे पती तवंगर खान, त्यांचे काही नातेवाईक तसेच काँग्रेसचे पराभूत उमेदवार सोहेल रजा यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा त्यांचा आरोप आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच पोलिसांनीही हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट केलेले नसून, घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या प्राणघातक हल्ल्यानंतर चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT