चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच होळी धुलीवंदन रमजान व अन्य सण उत्साहात साजरे व्हावेत याकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील 518 गुन्हेगारांना गावबंदी केली आहे. याबाबत चंद्रपूर व जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत.
आज गुरुवारी होळी आणि उद्या धुलीवंदन, रंगपंचमी सण सर्वत्र साजरा होत आहे. त्या शिवाय रमजान व इतर महत्वाचे सण येत्या काळात साजरे होणार आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सर्व उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात पुरेसा योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांतता व सुव्यवस्था भंग होणार नाही यासाठी काळजी घेण्याची आवाहन केले आहे याच पार्श्वभूमीवर 518 गुन्हेगारांवर गावबंदी आदेश बजावण्यात आले आहे.
जिल्ह्यायातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात शांततामय वातावरण राहण्यासाठी भारतीय न्याय संहिता कलम १६३ नुसार जिल्ह्यातील ६४१ रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरूध्द हद्दपार/गाव परिसरात वास्तव्यास बंदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यापैकी ५१८ गुन्हेगाराविरूध्द अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश पारित केले आहे.
मागील दोन दिवसात जिल्हयात दारूबंदी कायद्यान्वये ५७ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. कालच बुधवारी देशी कट्टा व जिवंत काडतुस सह एका गुन्हेगारास अटक केली आहे.