चंद्रपूर : शौचास गेलेल्या एका ३० वर्षीय युवकाला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरूवारी (दि.१) रात्री दहाच्या सुमारास घडली. दिवाकर बाबुराव जुमनाके असे मृत युवकाचे नाव आहे. तो चंद्रपूर तालुक्यातील चक पिंपळखुट येथील रहिवासी होता.
याबाबत अधिक माहिती अशी, चंद्रपूर तालुक्यातील चक पिंपळखुट येथील रहिवासी दिवाकर जुमनाके हा गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास गावालगतच्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर वनविभाग कक्ष क्रं. १००५ मध्ये शौचास गेला होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे चक पिंपळखुट परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाने मृताच्या कुटुंबियांना ३० हजाराची मदत दिली आहे.