Chandrapur Child heart attack
ब्रह्मपुरी: शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्यावर काळाने घाला घातला. शाळेचा गणवेश परिधान करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथे घडली आहे.
ईशान सत्यपाल आत्राम असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, तो ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.
मंगळवारी सकाळी ईशान नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी आनंदाने उठला होता. त्याने आपली नित्यकर्मे आटोपली आणि आंघोळ करून तो शाळेचा गणवेश परिधान करत होता. मात्र, सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक त्याच्या छातीत कळ आली आणि तो जमिनीवर कोसळला.
आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहून आई-वडिलांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खेळण्या-बागडण्याच्या वयात आणि ज्या वयात हृदयविकाराचा विचारही मनाला स्पर्श करत नाही, अशा अवघ्या १० व्या वर्षी ईशानचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निष्पाप बालकाचा असा अचानक झालेला अंत पाहून आरोग्य तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले असून, या घटनेमुळे देलनवाडी गावावर शोककळा पसरली आहे.