ताडोबा राष्ट्रीय अभयारण्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यात आणि राज्याबाहेरही पसरले आहे. पंचक्रोशीतील पर्यटकांची ताडोबात नेहमीच गर्दी उसळलेली असते. परंतु ताडोबा अभयारण्याबाहेर एखाद्या शेतशिवारात जर वाघाला पाहण्यासाठी गर्दी उसळली तर..! होय आज सोमवारी (दि. ८) ला सकाळी वरोरा तालुक्यातील मोखाडा शेतशिवारात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. रात्री शिकारीच्या शोधात पट्टेदार वाघ विहिरीत पडला. रात्रीपासून ते दुपारपर्यंत वाघाने आपला जीव मुठीत घेऊन विहीतील पाण्यावर तरंगत काढला. वनविभागाने केलेल्या तब्बल पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनंतर वाघ विहीरीबाहेर पडला आणि त्याने जंगलाच्या दिशेने एकच धूम ठोकली. गर्दीच्या गराड्यात वाघाचा जीव वाचविण्यासाठी रेस्क्यू झाले तर तब्बल पाच तास नागरिकांनीही वाघाचे दर्शन घेऊन पर्यटनाचा आनंद लुटला.
वरोरा तालुक्यातील मोखाडा शेतशिवारात शिरपाते यांच्या मालकिचे शेत आहे. शेतात सिंचनाची सुविधा म्हणून विहीरीचे बांधकाम झाले आहे. सुमारे तीस फुट खोलीच्या विहीरीत काल रविवारी रात्रीच्या सुमारास एक पट्टेदार वाघ विहिरीत पडला. ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य लागून असल्यामुळे शिकारीच्या शोधात वाघांचे अभयारण्याबाहेर नेहमी भ्रमंती असतेच. अशाच काल एका पट्टेदार वाघाला रात्रीची शिकारीच्या शोधातील भ्रमंती जीव टांगणीला लावणारी पडली. रात्रभर वाघ विहिरीतच आपला टांगणीला लावून विहिरीतील पाण्यावर तरंगून वाचविण्याचा आटापिटा करीत होता. आज आज सोमवारी सकाळी शेतीचे मालक विहिरीजवळ गेले असता, त्यांना विहिरीत गुरगुरण्याचा आणि डरकाळ्यांचा आवाज आला. त्याने विहीरीत बघितले असता तर काय वाघ विहिरीत पडलेला दिसला. वाघाला बघताच शेतक-याची एकच तारांबळ उडाली. लगेच माहिती वरोरा वनविभागाला देण्यात आली. वनाधिका-यांचा ताफाघटना स्थळाकडे रवाना झाला.
मोखाडा शिवारात वाघ विहिरीत पडल्याची माहिती सर्वत्र वा-याप्रमाणे पसरली आणि नागरिकांची या ठिकाणी एकच गर्दी झाली. वाघाला पाहण्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुणी मोबाईल मध्ये फोटो तर कुणी व्हिडिओ काढून वाघाला आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करीत होते. तर याच गर्दीला नियंत्रणात ठेवून वाघाचे जीव वाचविण्यासाठी वनाधिका-यांची प्रचंड धडपड सुरू होती.
शेतशिवारातील विहिरीत पडलेल्या एका पट्टेदार वाघाला वाचवण्यासाठी वन विभागाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आणि त्यात यशही आले. रात्रभर विहीर असलेला वाघ तब्बल पाच तास आपले जीव मुठीत घेऊन विहीरीत सैरावैरा फिरताना दिसत होता. वाघाला विहीरीबाहेर काढण्यासाठी वनाधिका-यांनी सर्व ताकदपणाला लावली होती. दुपारी एक वाजताचे सुमारास विहीरीत खाट टाकून वाघाला बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न झाला. परंतु खाटेवर येण्यास वाघ धजावेना. अखेर विहीरीत टाकलेल्या खाटेवरून पट्टेदार वाघाने आपला मार्ग निवडला. खाटेवरून विहीरीच्या तोंडीवर उडी टाकली आणि जंगलाच्या दिशेने एकच धूम ठोकली. विहीरीसभोवती नागरिकांची प्रचंड गर्दी होती. रात्र आणि अर्धा दिवस विहीरीत काढल्याने वाघही घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याने भितीमय वातावरणात आपला मार्ग जंगलाच्या दिशेने निवडला. नाहीतर गर्दीच्या दिशेने धाव घेतली असती तर संकटालाही नागरिकांना सामोरे जावे लागले असते.
एखाद्या वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी नेहमीच वनविभागाला प्राणाची बाजी लावावी लागते.आज सोमवारी वनाधिकारी व कर्मचारी यांना वाघाला वाचविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. एकिकडे गर्दी नियंत्रणात करणे तर दुसरीकडे वाघाला विहीरीबाहेर काढणे हे जिकरीचे काम होते. ते आजच्या घटनेत मोठ्या शिताफीने पार पाडण्यात आल्याने वाघाला बाहेर सुखरूप काढता आले. भारदस्त पट्टेदार वाघ विहिरीत पडल्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी. भल्यामोठ्या वाघाला रेस्क्यू करून विहीरीबाहेर काढण्यात आल्याने वनाधिकारी व कर्मचा-या चेह-यावर आपल्या कुटुंबातील सदस्याला वाचविण्याचे समाधान दिसून आले. एकंदरीत पट्टेदार वाघ विहीरीबाहेर पडल्याने वनाधिका-यांचा जीव भांड्यात पडला.