चंद्रपूर : चंद्रपूर येथील प्रसिध्द महाकाली देवीची यात्रा आजपासून ( दि.७ ) सुरू होत आहे. चंद्रपुरात भाविक दाखल होत असून, शहरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले आहेत. महाकाली मंदिरात चैत्र पौर्णिमेपासून दरवर्षी यात्रा भरते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्ष यात्रा खंडीत झाली होती. आता कोरोना निर्बंध हटविल्यामुळे यंदा यात्रेला माेठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील महाकाली मंदिराला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले. तसेच यात्रेनिमित्त विविध सूचना जिल्हाधिकारी यांनी मंदिर विश्वस्तांना दिल्या आहेत.