चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा जनावरे चारण्यासाठी आणि स्वतःच्या शेतातील कापूस पीक पाहण्यासाठी शेतावर गेलेल्या एका (साठ वर्षीय) शेतकऱ्याला वाघाने जंगलात उचलून नेल्याची खळबळजनक घटना घडली. चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा शेतशिवारात आज (शनिवार) सकाळी ही घटना उघडकीस आली. डोमळू सोनवाणे असे मृत्त शेतकऱ्याचे नाव आहे. तो डोमा या गावातील रहिवासी होता.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरातील डोमा गावातील शेतकरी डोमळू सोनवाणे यांच्याकडे दहा एकर शेती व जनावरे आहेत. काल (शुक्रवार) तो जनावरे चारण्यासाठी आणि त्याच ठिकाणी असलेल्या स्वतःच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास शेतात जनावरे चारत असताना याच परिसराला लागून असलेल्या जंगलातून एका वाघाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि थेट जंगलात उचलून नेले. सायंकाळी जनावरे घरी परत आली, परंतु शेतकरी घरी परत आला नाही. त्यामुळे घरच्या कुटुंबियांनी शेताकडे येऊन शोधाशोध केली, परंतू त्याचा पत्ता लागला नाही.
या परिसरात बऱ्याच महिन्यांपासून वाघाची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे रात्रभरात शेतकरी घरी परत न आल्याने वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आज सकाळी गावकऱ्यांनी पुन्हा डोमा परिसरातील शेतशिवार आणि जंगलात शोधमोहीम राबवली असता, शेतकऱ्याचा मृतदेह शेतलागत जंगलात आढळून आला. सदर घटनेची माहिती चिमूर वनपरिक्षेत्र धिकार्यांना देण्यात आली असून, ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. आठवडाभरात चिमूर तालुक्यात दोन घटना घडल्या असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू असून, शेतकरी सकाळपासून रात्रीपर्यंत शेतात काम करीत असतात. त्यातच आता शेतशिवारात वाघाची भ्रमंती दिसून येत असल्याने शेतकरी दहशतीत आहेत.
हेही वाचा :