विदर्भ

चंद्रपूर : धानोरा आर्वी पुल पाण्याखाली; नऊ गावांचा संपर्क तुटला

backup backup
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ झाल्याने गोंडपिपरी ते विरूर स्टेशन मार्गावरील धानोरा आर्वी पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने गोंडपिपरी तालुक्यातील नऊ गावांचा तालुका व जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. तर गडचांदूर चंद्रपूर मार्गावरील   भोयेगाव पुलावर २१ जुलैच्या रात्रीपासून पाणी चढल्याने हा मार्ग बंद आहे. सध्या जिल्ह्यात दोन्ही मार्ग बंद आहेत. कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील पैनगंगेचे पाणी घरात शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने सखल भागातील २० घरे खाली करण्यात आली आहेत. त्यांची व्यवस्था प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आली आहे. तर कापसाची ५० टक्के शेती पाण्याखाली आली आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात कधी संतंतधार, कधी मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी (दि. २१) जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज शनिवारी (दि. २२)  अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. परंतु आज पावसाची रिपरिप सुरू होती. काही दिवसांपासून संततधार व कालच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाण्याचा विसर्ग पैनगंगेमध्ये वाढला आहे. परिणामत: वर्धा नदी फुगली आहे.
आज (दि. २२) सायंकाळी वर्धा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गोंडपिपरी तालुक्यातील विरूर स्टेशन ते गोंडपिपरी मार्गावरील धानोरा आर्वी जवळील वर्धा नदीचे पुल पाण्याखाली आल्याने मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव, तोहोगाव, वेजागव, लाठी सरांडी, वामनपल्ली, सकमूर, धाबा गावाचा तालुका व जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. गडचांदूर ते चंद्रपूर मार्गावरील भोयेगाव पूलावर २१ जुलैच्या रात्री आठ वाजल्यापासून पाणी चढल्याने हा मार्ग अद्याप बंद आहे.
सध्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गावालगतचे नाल्यातील पाणी मार्गक्रमण होताना थांबले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्तेही थांबलेल्या, परत येणाऱ्या पुराच्या पाण्याने बंद होण्याची शक्यता आहे. पैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोरपना तालुक्यातील अंतरगावात पाणी शिरला आहे. त्यामळे त्यामुळे सखल भागातील सुमारे २० खाली करण्यात आली आहे. त्या कुटूंबियांची व्यवस्था गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.  अंतरगाव परिसरातील ५० टक्के कापसाची शेती पाण्याखाली आली आहे. पाणी वाढत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
SCROLL FOR NEXT