विदर्भ

चंद्रपूर: रानडुक्कराच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील शासकीय कार्यक्रम आटोपून घरी परताना अंगणवाडी सेविकेला डुक्कराने जोराची धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१०) संध्याकाळी सातारा तुकूम घटमाऊली जंगलात घडली. शीला रविंद्र बुरांडे (वय ४०, रा. देवाडा खुर्द) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मृत शीला रविंद्र बुरांडे देवाडा खुर्द‌‌‌ येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू आहेत. त्या अंगणवाडी सेविकेच्या संघाकडून खोखो स्पर्धेत भाग घेण्यासाठी चंद्रपूरला गेल्या होत्या. स्पर्धा आटोपल्यानंतर त्या देवाडा खुर्द‌‌‌ला आपल्या पतीसोबत दुचाकीने परत येत होत्या. यावेळी गिलबिली सातारा तुकूम मार्गावरील जंगल परिसरातील घट माऊली मंदिराजवळ त्या रस्त्याच्या कडेला उतरल्या.

यावेळी बाजुलाच झुडुपात असलेल्या डुकराने शीलाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात त्या रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे नेण्यात आला. उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत. शीला यांच्या मागे पती, दोन मुले, सासु, सासरे असा परिवार आहे. त्यांच्या निधनावर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, घटना घडून अनेक तास लोटले असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

हेही  वाचा 

SCROLL FOR NEXT