चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वीज प्रवाहाच्या धक्क्याने एका दोन वर्षीय नर अस्वलाचा मृत्यू झाला. गुरूवारी (दि. मार्च) ही घटना अंतरगाव पारडवाही येथे उघडकीस आली. याप्रकरणी भाडेतत्वावर शेती कसणा-या एका शेतक-यावर वनगुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गोपीनाथ शेंडे (रा.मूल) असे शेतकऱ्याचे नाव आह.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पासून जवळच असलेल्या अंतरगाव पारडवाही येथे सुधीर कावळे यांची धानाची शेती आहे. त्यांनी आपली शेती भाडेतत्वावर मूल येथील गोपीनाथ शेंडे यांना कसण्यासाठी दिलेली आहे. धानाचे पीक निघाल्यानंतर शेंडे यांनी उन्हाळी पिक म्हणून पाच एकरामध्ये मक्याची लागवड केली आहे. रानडुकरांपासून पिकाचे सरंक्षण व्हावे यासाठी त्यांनी तारेचे कुंपण केले. त्यावर महावितरणाच्या विद्युत खांबावरून आकडा टाकून वीज प्रवाह पुरवठा केलेला होता. त्याच प्रवाहामुळे या परिसरात फिरणा-या अस्वलाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
बुधवारी (दि. १ मार्च) रात्री हि घटना घडली. आज गुरूवारी दुस-या दिवसी वनविभागाचे कर्मचारी या परिसरात गस्त घालत असताना त्यांना वास आल्याने त्यांनी घटनास्थळ गाठले. यात त्यांना अस्वल मृतावस्थेत सापडले. त्यांनी लगेच वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे, महावितरणचे अभियंता पंकज उजवणे, प्राणी मित्र उमेश झिरे यांनी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी दोषी आढळलेले गोपीनाथ शेंडे यांच्या विरूदध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मृत अस्वलाला मूल येथे आणून चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी शवविच्छेदन केले.वनविभागाच्या परिसरात मृत अस्वलाला दफन करण्यात आले.