Deulgaon Raja Water Crisis pudhari photo
बुलढाणा

Deulgaon Raja Water Crisis : देऊळगाव राजात पाणी पेटले

रणरागिणी रस्त्यावर, न.प.प्रशासनावर रोष

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा ः देऊळगाव राजा शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर महिलांनी रस्त्यावर उतरत पालिका प्रशासनाविरोधत रोष प्रगट केला. यावेळी नगर पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महिलांनी शहर दणाणून सोडले.

शहरात आयोजित करण्यात आलेल्या विराट हंडा मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून हजारो महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोक्यावर हंडे, हातात रिकामी भांडी आणि तोंडात संतप्त घोषणा देत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

“पाणी हा आमचा हक्क आहे, उपकार नाही!”, “धरण उशाशी” यासह इतर घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरू काढण्यात आलेला विराट मोर्चा नगरपरिषद कार्यालयावर धडकला. संतप्त नागरिकांनी नगरपरिषदेला घेराव घालत प्रशासनाला थेट जाब विचारला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिस प्रशासनाला पूर्वसूचना देत निवेदनही सादर केले. या निवेदनात शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. शहराजवळ धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही आणि कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दहा दिवसांआड पाणी

नागरिकांच्या आरोपानुसार, शहरात तब्बल दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे नळाद्वारे येणारे पाणीही दूषित आणि अस्वच्छ असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. अनेक भागांमध्ये हिरवट रंगाचे पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT