बुलढाणा

Bride father death in marriage | 'कन्यादान' करत असतांना वधूपित्याचा मंडपातच मृत्यू, वर्दडी गावातील दु:खद घटना

या आकस्मिक घटनेमुळे विवाह सोहळ्याचे आनंदी वातावरण क्षणार्धात दु:खसागरात बुडाले

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : मुलीच्या विवाह सोहळ्यात कन्यादान विधी सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने वधूपित्याचा मंडपातच मृत्यू झाल्याची दु:खद घटना वर्दडी बुद्रुक (ता.सिंदखेडराजा) गावात बुधवारी १२ मेच्या सायंकाळी घडली.

या आकस्मिक घटनेमुळे विवाह सोहळ्याचे आनंदी वातावरण क्षणार्धात दु:खसागरात बुडाले. मुलीच्या पाठवणी पूर्वीच वधूपित्याला भरमंडपातच मृत्यूने असे गाठल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुरूमदास कुंडलिक भुतेकर (वय : ५० वर्षे, रा.वर्दडी) हे मृत दुर्दैवी पित्याचे नाव आहे.

कुरूमदास यांची कन्या नंदिनी हिचा विवाह सोहळा आर्डा तोलाजी (जि.जालना) येथील नानोटे परिवारातील वराशी वर्दडी बुद्रुक येथे बुधवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी नववधू नंदीनी हिची सासरी पाठवणी करण्यापूर्वी मंडपात कन्यादान विधी सुरू होता. याचवेळी वधूपिता कुरूमदास भुतेकर यांच्या छातीत तीव्र कळ आल्याने ते जागीच कोसळले. हा हृदयविकाराचा धक्का असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. कुरूमदास यांना तात्काळ सिंदखेडराजा येथील रुग्णालयाकडे हलवण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे विवाह सोहळ्याच्या आनंदी वातावरणात दु:खाचे सावट पसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT