बुलढाणा : समृध्दी महामार्गावर पुण्याकडून अमरावतीकडे निघालेली भरधाव कार समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात कारमधील ४ वर्षाच्या मुलासह पती पत्नी ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा शिवारात समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
राजेश दाभाडे (वय ४२), पत्नी शुभांगी राजेश दाभाडे (वय ३२) आणि मुलगा रियांश राजेश दाभाडे (वय ४) (रा. धामणगाव रेल्वे, जि.अमरावती) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर समिक्षा राजेश दाभाडे व कार चालक अश्विन धनवरकर हे दोघे जखमी झाले. ट्रक चालक गाजा शेख रा. जालना याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एम.एच १७ एजे ९१७३ क्रमांकाच्या कारमधून दाभाडे परिवार दिवाळी सणानिमित्त अमरावतीकडे जात होते. समृध्दी महामार्गावर चॅनल क्र. ३३४ नागपूर कॉरिडारवर भरधाव वेगाने निघालेली त्यांची कार समोरील ट्रक क्र. एमएच-२१ बीएच ५९७६ ला धडकली. या दुर्घटनेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला.