बुलढाणा : यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात सततच्या अतिवृष्टीने आणि महापूराने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे खरिपाच्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा वेळी शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानने मानवी संवेदनशीलता दाखवत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
शनिवार, २७ सप्टेंबर रोजी संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. श्री गजानन महाराज संस्थानने यापूर्वीही विविध नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत निधी उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली आहे. सेवाकार्यासोबतच समाजातील दुःखात सहभागी होण्याची परंपरा संस्थानने कायम राखली आहे.