Sanjay Gaikwad Publisher Dispute
बुलढाणा : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला शिवीगाळ व धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने अखेर शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी माघार घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी (दि. २४) दुपारी व्हायरल झालेल्या सुमारे साडेचार मिनिटांच्या व्हिडिओमध्ये संजय गायकवाड यांनी संबंधित पुस्तकाच्या प्रकाशकाला उद्देशून केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी प्रकाशक आंबी तसेच त्यांच्या कुटुंबीयांविषयी वापरलेल्या शब्दांबाबत माफी मागितली.
या व्हिडिओत ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे कोट्यवधी भारतीयांचे दैवत असून त्यांच्या नावाचा अवमान सहन केला जाणार नाही. संबंधित पुस्तकात “शिवाजी” असा एकेरी उल्लेख अनेक वेळा करण्यात आल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला.
तसेच, पुस्तकाचे वाचन करताना किंवा चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करावा, असे आवाहनही त्यांनी केले. “ज्यांना हे पुस्तक वाचायचे असेल, त्यांनी योग्य आदर राखावा; आम्हीही ते ऐकण्यासाठी उपस्थित राहू,” असेही त्यांनी नमूद केले.
यापूर्वी विधानसभेतही राज्यातील संस्थांच्या नावांमध्ये ‘शिवाजी’चा एकेरी उल्लेख दुरुस्त करण्याची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.