देऊळगाव राजा ः दरोड्यातील आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात.  pudhari photo
बुलढाणा

Samruddhi expressway robbery case : समृद्धी मार्गावरील दरोड्याचा उलगडा

आंतरराज्य टोळी जेरबंद, 12.48 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा ः समृद्धी महामार्गावर धान्य व्यापाऱ्याला मारहाण करून 12 लाखांची रोकड व वाहन लुटणाऱ्या आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा बुलढाणा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पर्दाफाश केला. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरातून 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिस्टल, काडतुसे, दोन चारचाकी वाहने, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 12 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात गुजरात राज्यातील बनासकाठा जिल्ह्यातील लवाना येथील अभयसिंह आनंदसिंह वाघेला (32) यांनी किनगांव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी हे 2 मे रोजी सकाळी नागपूरहून 12 लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ (क्र.01, 3768) वाहनाने गुजरातकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टोलनाक्याजवळ त्यांनी टायर तपासण्यासाठी वाहन थांबवले असता, पाठीमागून आलेल्या बोलेरो व इनोव्हा वाहनांतील 10 ते 12 अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला.

चापटाबुक्क्यांनी मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून आरोपींनी त्यांना त्यांच्या वाहनात बसवले व स्कॉर्पिओसह 12 लाखांची रोकड लुटली. त्यानंतर फिर्यादीस जालना जिल्ह्यातील जंगल परिसरात सोडून आरोपी फरार झाले. या प्रकरणी किनगांव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हिम्मतसिंग कुंदनसिंग जुनी (अंबाजोगाई, बीड), मुन्ना केशवकुमार वर्मा (उत्तर प्रदेश), मनोज सर्जेराव कुटे (बीड), मो. रशिद नुरदिन गुज्जर (जम्मू-काश्मीर), सचिन बुद्धाजी शिर्के (रायगड), हरीष तोमर देवळीकर (कर्नाटक), अरुणकुमार रामनरेश यादव (उत्तर प्रदेश) व जसपालसिंग केसरसिंग झाला (गुजरात) यांचा समावेश आहे.

आरोपींकडून 1 लाख 80 हजार रुपये रोख, देशी बनावटीची पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, एक इनोव्हा कार, बोलेरो वाहन (क्र. -24--1411), 4 मोबाईल, 2 वाय-फाय डिव्हाईस व बनावट नंबर प्लेट असा एकूण 12 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी संजय मातोंडकर व किनगाव राजा पोलीस करीत आहे.

आरोपी जेरबंद आठ जणांना अटक

तपासादरम्यान आरोपी अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी सापळा रचला व जीवाची पर्वा न करता धाडसी कारवाई करत 8 आरोपींना जेरबंद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT