देऊळगाव राजा ः ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि कष्टकरी कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाचा आधार मानली जाणारी ‘चटणी-भाकरी’ आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या ज्वारी, मिरची, तेल आणि भाजीपाल्याच्या वाढत्या दरांमुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.
ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंबांचे मुख्य अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, लाल मिरचीची चटणी आणि कांदा. मात्र, यंदा अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि उत्पादनातील घट यामुळे बाजारात ज्वारीचे दर प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. लाल मिरचीचे दरही 300 रुपयांच्या आसपास गेल्याने स्वयंपाकघराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खाद्यतेल, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
महागाईचा फटका केवळ ग्राहकांनाच नव्हे, तर शेतकऱ्यांनाही बसत आहे. खते, बियाणे, कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च वाढला असताना शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांना उत्पादन खर्च काढणेही कठीण होत असल्याची परिस्थिती आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे अनेक कुटुंबांनी भाजीपाल्याचा वापर कमी केल्याचेही दिसून येत आहे. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांसाठी दोन वेळचे जेवण भागवणेही कठीण बनले आहे.
पूर्वी गरीबांचा सर्वात स्वस्त पर्याय मानली जाणारी ‘चटणी-भाकरी’ आता महाग होत चालल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर नियंत्रण ठेवावे, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच रेशन दुकानांमार्फत स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासनाने दिलासा द्यावा- महागाई सातत्याने वाढत असून त्याचा सर्वाधिक फटका गरीब, शेतकरी आणि मजूर वर्गाला बसत आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापरातील अन्नधान्य, गॅस, तेल आणि औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष उपाययोजना करून महागाई नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी आणि सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलावीत.योगेश सदाशिव बनकर, सामाजिक कार्यकर्ते, अंढेरा