बुलढाणा : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा आज रविवारी (दि.१२) सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाडा स्थित जिजाऊ जन्मस्थळावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व सौ. राजश्रीताई जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी सुवासिनी महिलांनी जिजाऊ जन्माचे पाळणा गीत व जिजाऊ वंदना गायिली.
पुरातत्व विभाग नागपूर, सिंदखेड राजा नगरपरिषद आणि मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित या सोहळ्यास कामगारमंत्री आकाश फुंडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, लखुजीराजे जाधवांचे १३वे वंशज शिवाजी जाधव, माजी आमदार डॅा. राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले.
महापुजेनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, जिजाऊ माँसाहेब यांच्या रुपाने सिंदखेडराजा नगरीला आदर्श पुत्र व पराक्रमी राजा घडविणा-या राष्ट्रमातेची नगरी म्हणून विश्वख्याती प्राप्त झाली आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते शासकीय पुजा करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलतांना फुंडकर म्हणाले, राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव ही सकल महाराष्ट्रातील अनुयायांसाठी वर्षभराची प्रेरणादायी शिदोरी असते. जिजाऊंचा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आपण आगामी काळात प्रयत्न करणार आहोत. लखुजीराजे जाधव यांचा राजवाडा, जिजाऊंच्या जन्मस्थळासंदर्भातील विकास कामांमधील अडचणी दूर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजा करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल. तसेच सिंदखेडराजा विकास आराखड्याला गती देण्यात येईल, असे कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले.