बुलढाणा

Tulika Jadhav: जिद्द, मेहनतीला सलाम; बुलढाण्याच्या तुलिकाला सेरेब्रल पाल्सीही रोखू शकलं नाही, बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक

बुलढाण्याची कन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर बुलढाण्याच्या तुलिका सतीशचंद्र जाधव या दिव्यांग खेळाडूने राष्ट्रीय युवा पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावून बुलढाण्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. या दैदीप्यमान कामगिरीमुळे ती आता बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरली आहे.

उत्तर प्रदेशमधील गौरव खन्ना एक्सलन्स हायपरफॉर्मन्स सेंटर येथे ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. तुलिका, जी जन्मजात 'सेरेब्रल पाल्सी' या विकाराने ग्रस्त आहे, तिने या स्पर्धेत आपल्या अजोड कौशल्याचे आणि जिद्दीचे प्रदर्शन केले. तिच्या शरीराच्या उजव्या बाजूच्या हालचालींवर मर्यादा आहेत, शरीराचे वजन एका पायावर जास्त पडते आणि तिला चष्माही वापरावा लागतो. तरीही, या शारीरिक मर्यादांना तिने कधीही आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिले नाही.

धाड येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीत शिकणाऱ्या तुलिकाने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. २०२३ च्या राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते, तर खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने आपली छाप पाडली आहे. २०२३ मध्ये कंपाला, युगांडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती विजेती ठरली होती. याशिवाय, २०२४ च्या चॅम्पियनशिपमध्ये तिने एक रौप्यपदक आणि २०२५ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदक जिंकले होते.

तुलिकाचे वडील, डॉ. सतीशचंद्र जाधव, शासकीय कृषी तंत्र विद्यालय बुलढाणा येथे प्राचार्य आहेत. त्यांच्या आणि तिच्या प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळेच तुलिकाने यशाची ही शिखरे गाठली आहेत. तिची ही कामगिरी अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे.

तुलिकाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिला पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT