National Ayush Arogya Mela 2026
बुलढाणा : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेगांव येथे "राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६" आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या आरोग्य मेळाव्याचे उदघाटन होणार आहे .अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री जाधव यांनी सांगितले की, या मेळाव्याच्या उदघाटन कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री मकरंद पाटील, सह पालकमंत्री संजय सावकारे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आ.डॉ.संजय कुटे,अ.भा. आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री, पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा तसेच आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रो. राकेश शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
आयोजनाची जबाबदारी ही अखिल भारतीय आयुर्वेद महासंम्मेलनाला देण्यात आली आहे.त्र्यंबकेश्वर येथे १९०७ साली स्थापन झालेली आयुर्वेदाची सर्वात मोठी संघटना असून देशभर कार्यरत आहे.आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतींचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीकोनातून आयोजन करण्यात आले आहे.
चारही दिवस नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विविध तज्ञांच्या व्याख्यानातून आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच शेतक-यांना वनौषधी लागवडी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष औषध निर्माता कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून 'गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस'चा अवलंब ते कशा पद्धतीने करीत आहेत,सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नव- नवीन संशोधन याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. आयुष औषधी निर्माता वर्गासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या ठिकाणी वनऔषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना आपल्या जवळपास सापडणाऱ्या वन औषधीच्या साहाय्याने सोपे आणि माफक दरात उपचार कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात हे सांगितले जाणार आहे. या पत्रकार परिषदेला कामगारमंत्री आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता, कार्यकारी अधिकारी अवधेश कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.