Rising water level Lonar Pudhari
बुलढाणा

Lonar Lake | “विश्वास बसेल असे कारण सांगा,”: लोणार सरोवरातील वाढत्या जलपातळीवर नागपूर खंडपीठाने शासनाला सुनावले

Buldhana News | जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील जलपातळी अलीकडच्या काळात अचानक वाढल्याने सरोवर परिसरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत

पुढारी वृत्तसेवा

Rising water level Lonar

बुलढाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील जलपातळी अलीकडच्या काळात अचानक वाढल्याने सरोवर परिसरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. या घडामोडींमुळे सरोवरातील समृद्ध जैवविविधतेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भातील वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे.

शुक्रवार, दि. २७ रोजी न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरोवरातील वाढत्या जलपातळीची कारणे शासनाकडे विचारली. त्यावर यंदा लोणार परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जलस्तर वाढल्याचे कारण शासनाने मांडले. मात्र न्यायालयाने या स्पष्टीकरणावर आश्चर्य व्यक्त करत, “विश्वास बसेल असे किमान कारण सांगा,” अशा शब्दांत शासनाला सुनावले.

तसेच, “अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी कधीच झाला नव्हता काय?” असा प्रतिप्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. शासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने जलपातळी वाढीमागील नेमकी कारणे शोधून काढण्याचे निर्देश दिले. याचिकेची पुढील सुनावणी बुधवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे.

बेसाल्ट खडकांवर उल्का आदळून तयार झालेले हे दुर्मिळ ‘मेटिओराइट क्रेटर’ म्हणून लोणार सरोवर आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी महत्त्वाचे मानले जाते. खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर म्हणूनही त्याची ओळख आहे. यामुळे संशोधक आणि पर्यटक यांच्यासाठी ते विशेष आकर्षण ठरते. यंदा प्रथमच परिसरातील प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेल्याने भाविकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT