नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सहज आणि सोप्या राहिल्या नाहीत. काही ठिकाणी तर एक-दोन-तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो. एवढेच नाही तर काही ठिकाणी एका व्यक्तीकडून 100 बोकड द्यावे लागतात. एवढ्या खर्चिक निवडणुकीत कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात, असे वादग्रस्त विधान बुलडाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नागपुरात केले. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात बोलत होते.
आ. संजय गायकवाड हे वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते साधे बोलतच नाहीत, वादग्रस्तच बोलतात. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी दिली, पण ते सुधारायला तयार नाही. आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार्या खर्चासंबंधी वादग्रस्त विधान केले आहे. गायकवाड म्हणाले, आम्ही भाजप-शिवसेना (शिंदे) युतीला प्राधान्य देतो. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती करतो, पण कार्यकर्त्यांची निवडणूक असते (स्थानिक स्वराज्य संस्था) तेव्हा आपण त्यांना वार्यावर सोडतो. आता निवडणुका पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. काही ठिकाणी एक-दोन तर काही ठिकाणी तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो.