'राघू मैना'च्या लोणार येथील सेटवर नायिका मधू कांबीकर व नाना पाटेकर. 
बुलढाणा

Actress Madhu Kambikar|'राघू' पाठोपाठ 'मैना'ही आज उडून गेली! अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, पडद्यावरच्या 'लव्ह बर्ड'ची अशीही गोष्ट

'राघू' पाठोपाठ 'मैना'ही आज उडून गेली! ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड .पडद्यावरच्या 'लव्ह बर्ड'ची अशीही गोष्ट

पुढारी वृत्तसेवा

विजय देशमुख, बुलढाणा

पडद्यावरील 'लव्ह बर्ड'ची एक दु:खदायक पण विलक्षण योगायोगाची बातमी समोर आली आहे. 'राघू-मैना'चित्रपटातील'राघू'नाना पाटेकर यांच्या निधनाच्या पाचव्या दिवशी त्याच चित्रपटातील 'मैना' ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे आज सोमवारी पुणे येथे निधन झाल्याची बातमी आली आहे. नानांना नायक म्हणून पहिली संधी व ओळख विदर्भाने दिली होती तशीच नायिका म्हणूनही पहिली ओळख मधू कांबीकर यांना 'राघू मैना'(१९८२) या चित्रपटातूनच मिळाली होती. अर्थात त्याचवर्षी मधू कांबीकर यांचा 'शापित'हाही पुरस्कार प्राप्त चित्रपट आला होता.

अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॅडी देशमुख यांनी १९८२ मध्ये 'राघूमैना'या रंगीत मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्यात नायक म्हणून नाना पाटेकर तर नायिका मधू कांबीकर अशी जोडी होती. अशोक सराफ, निळू फुले हे दिग्गज कलाकारही त्यात होते. नायक म्हणून नवख्या नाना पाटेकर यांना तर नायिका म्हणून मधू कांबीकर यांना प्रथमच संधी निर्माते डॅडी देशमुख यांनी दिली होती.

'राघूमैना' हा नानांचा व मधू कांबीकर यांचा मुख्य भूमिकेतील पहिलाच चित्रपट होता. डॅडी देशमुख यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर 'देवकी नंदन गोपाला' या चित्रपटाची निर्मिती केलेली होती. त्याचे दिग्दर्शक राजदत्त होते. 'राघूमैना' चित्रपटासाठी नायक म्हणून राजदत्त यांनी डॅडी देशमुखांना नाना पाटेकर यांचे तर नायिका म्हणून मधू कांबीकर यांचे नाव सुचवले होते.

विठ्ठल वाघ, श्रीकृष्ण राऊत, व डॅडी देशमुख यांनी 'राघूमैना'ची श्रवणीय गाणी लिहीली. तर पटकथा वसंत सबनीस यांची होती. लोककलावंताच्या प्रेमकथेची शोकांतिका अशी थीम असलेल्या त्या चित्रपटात अभिनेत्री मधू कांबीकर (मैना)च्या सोबतीने नाना (राघू)ची ट्यूनिंग जमली. नायक-नायिका म्हणून प्रथमच संधी मिळाल्याने नाना व मधू या जोडीने अभिनयात जीव ओतला.

एका फिरत्या तमाशा फडात ढोलकी वाजवणारा राघू व त्यातीलच नृत्य कलावंतीण मैना या दोघांत प्रेम निर्माण होते.फडाला पैसा पुरवणारा सावकार याचा देखण्या 'मैना'वर डोळा असतो. राघू व मैनात प्रेम फुलल्याचे पाहून सावकार हा राघूला कर्जाच्या जाळ्यात अडकवतो. सावकाराच्या जाचाला कंटाळून राघू व मैना फड सोडून निघून जातात. स्वतःचा संसार थाटण्याचा प्रयत्न करतात.पण समाज त्यांना स्वीकारत नाही. तमाशातील बाई म्हणून गावकऱ्यांकडून मैनेची अवहेलना होते. शेवटी राघूला संघर्ष करावा लागतो. प्रेम,वंचना, समाजाची बंधने यामुळे कथा शोकांतिकाकडे झुकते. ढोलकी वाजवणारा राघू शेवटी बंदूक हातात घेतो. त्याकाळातील ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलावंताच्या जीवनाचे वास्तव चित्रण 'राघूमैना'तून मांडले गेले होते.

अकोला, चिखलदरा, पातूर, लोणार या ठिकाणच्या चित्रीकरणातून अस्सल ग्रामीण बाज चितारला गेला होता. विदर्भाच्या मातीत तयार झालेल्या 'राघूमैना'ला दादासाहेब फाळके उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (१९८३-८४)मिळाला होता. तर नाना पाटेकर यांना उत्कृष्ट अभिनेता शिवाजी गणेशन पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक-राजदत्त,उत्कृष्ट पटकथा -वसंत सबनीस, उत्कृष्ट कलादिग्दर्शन-किशोर मोरे अशा प्रतिष्ठित पुरस्कारांवर मोहर उठवून ''राघू-मैना" हा अस्सल ग्रामीण प्रेमकथेवरील चित्रपट ८०च्या दशकात तरुणाईने डोक्यावर घेतला होता.

नाना पाटेकर व मधू कांबीकर यांना नायक -नायिका म्हणून पहिली ओळख 'राघूमैना'या मराठी चित्रपटाने दिली होती.दोघांच्याही चित्रपट कारकिर्दीसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. 'राघू' पाठोपाठ आज 'मैने'नेही एक्झीट घेतली आहे.ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी आपल्या ३० वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक लोकनाट्य,नाटक व ७५चित्रपटातून ठसा उमटवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT