बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा – खामगाव-शेगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्यावर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिहेरी वाहन अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून परतवाड्याकडे जाणाऱ्या एस.टी. बसला बोलेरो गाडीने धडक दिली. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने एस.टी. बसला जोरदार धडक दिली. या तिहेरी अपघातात शेगाव येथील बोलेरो चालकासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने खामगाव आणि अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.