बुलढाणा : बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा, कठोरा या गावांतील नागरिकांना तीन दिवसात टक्कल पडत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 40 ते 50 जणांना हा त्रास सहन करावा लागला असून, आरोग्य खात्याचे पथक तातडीने या गावांमध्ये रवाना झाले.
गेल्या तीन चार दिवसापासून अगोदर लोकांच्या डोक्याला खाज सुटते अन् मग केस गळायला लागतात. दोन तीन दिवसांनी संपूर्ण केस गळून जातात व टक्कल पडते, असे ग्रामस्थांनी सांगितले. पुरूषांप्रमाणे महिलांची केस गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात आले. शॅम्पू वापरणार्यांना हा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, परंतु ग्रामस्थांनी मात्र ही बाब नाकारत शॅम्पू वापरत नसल्याचे, म्हटले आहे. यानंतर वैद्यकीय पथक या गावांमध्ये दाखल झाले आहे.
विचित्र आजारामुळे परिसरातील ग्रामस्थ चिंतेत असून, आरोग्य विभागाने केसाचे नमुने गोळा करीत सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत. कालवड येथे 13 लोकांना तर कठोरा येथील 7 लोकांना टक्कल पडले असल्याचे बुधवारी सर्व्हेक्षणात आढळून आले, अशी माहिती आरोग्य पथकाने दिली. स्नानासाठी बोअरवेलचे पाणी वापरले जात असल्याने टक्कल पडत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. परंतु नेमके कारण तपासणीअंती कळू शकणार आहे.
शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना निवेदन देऊन या आजाराची दखल घेत उपचार व मार्गदर्शन शिबिर घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर आजाराची माहिती दिली आहे.
एका गावात 15 ते 20 रूग्ण आतापर्यंत आढळून आल्याने तिन्ही गावांमधील जवळपास 60 रूग्णांना केस गळतीचा त्रास आढळून आला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी दीपाली भायेकर यांनी दिली. आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. नेमका प्रकार का घडत आहे याचा आम्ही शोध घेत आहोत, त्वचारोग, रक्तदोष ही त्याची कारणे असू शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.