Harshwardhan Sapkal vs pratap jadhav  
बुलढाणा

Harshwardhan Sapkal | आयुष यंत्रणेचेच 'टक्कल' पडले आहे, केवळ मेळावे भरवून आरोग्यसेवा कशी सुधारणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आयुषमंत्री जाधवांना टोला..

पुढारी वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यातील ७० आयुष रूग्णालये ही मूलभूत सुविधांअभावी 'श्वास' मोजत असतांना दुसरीकडे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शेगावात राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित केला आहे या विसंगतीकडे लक्ष वेधून कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

सपकाळ आणि जाधव दोघेही बुलडाणा जिल्ह्याचेच रहिवासी. राष्ट्रपतींच्या शेगांव दौ-याच्या पृष्ठभूमीवर सपकाळ यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजक आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधला. सपकाळ म्हणाले,सरकारचे धोरण 'आरंभशूर 'आहे. योजनेला सुरूवात करून पुढे निष्पन्न शुन्य. बुलडाणा जिल्ह्यात आयुष ची ७० रुग्णालये उभारली पण पुरेसा निधी, कर्मचारी व औषधांचा अभाव आहे.

राष्ट्रपतींचा कार्यक्रम आयोजिलेल्या शेगांव तालुक्यात मागील वर्षी शेकडो नागरिकांची केस गळती होऊन टक्कल पडले, पाठोपाठ नखेही गळू लागली.दुषित रेशन धान्य खाल्ल्याने हे घडले.पण वर्ष उलटूनही केस गळतीचे कारण समोर आलेले नाही.प्रशासकीय दबावामुळे केस व नखांच्या गळतीच्या अहवाल दडपला जात आहे.असा घणाघाती आरोप करून सपकाळ म्हणाले आपल्या कारभाराचे असे 'टक्कल'पडले असतांनाही मंत्री प्रतापराव जाधवांचा आयुष विभाग का गप्प बसून आहे?राष्ट्रपतींच्या दौ-यामुळे जिल्ह्यातील ७० आयुष रूग्णालयांना संजीवनी मिळावी व केस गळती प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी.केवळ मेळावे भरवून लोकांचे आरोग्य कसे सुधारेल?कागदावरच्या योजना प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी राष्ट्रपतींनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश द्यावेत अशी अपेक्षाही हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT