Kidnapped for ransom of Rs 20 lakh in Buldhana: Police rescue two businessmen from Gujarat
बुलढाणा : वीस लाखांची खंडणी मागण्यासाठी मलकापूर शहरातून अपहरण करण्यात आलेल्या गुजरातच्या दोन व्यापा-यांची बुलढाणा एलसीबीच्या पथकाने राजस्थानच्या कोटा भागातून सुखरूप सुटका करून दोन अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल्स व अपहरणासाठी वापरलेली कार जप्त केली आहे. आरोपी हे अमरावती शहरातील राहणारे आहेत पोलिसांच्या पथकाने शिताफीने त्यांचा माग काढत व पाठलाग करत राजस्थानातील कोटा शहराजवळ त्यांना गाठले आणि अपहृत दोघांचीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.अवघ्या अठ्ठेचाळीस तासात केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.
याबाबत एलसीबीच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,सोमवार २२ सप्टेंबर रोजी फिर्यादी जयदीप नक्कू गिडा रा. अडाजन जि.सुरत(गुजरात) यांनी मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, त्यांच्या क्रूड ऑइल कंपनीच्या तेलाचे महाराष्ट्रात वितरण व विक्रीसाठी नेमलेले व्यापारी प्रतिनिधी जयेश चंद्रकांत दत्ताजी (वय ४७) व हिम्मतभाई पंडीया (वय ५२) हे मलकापूर (जि.बुलढाणा)शहरात व्यवसायासाठी राहत होते.१९सप्टेंबरपासून या दोघांशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने ते दोघे हरवल्याची (मिसींग) तक्रार त्यांनी दाखल केली. दरम्यान,२२सप्टेंबर रोजी दोन अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना मोबाईल कालद्वारे सांगितले की, जयेश व हिम्मत भाई हे त्यांच्या ताब्यात असून त्यांना सोडण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी हवी आहे. खंडणी न दिल्यास किंवा पोलिसांना माहिती दिल्यास अपहरण केलेल्या व्यक्तींना जीवे मारू अशी धमकी दिली आहे. यावरून मलकापूर पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांचे स्वतंत्र तपास पथक नेमले.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, आरोपी हे त्यांचा सतत ठावठिकाणा बदलत असल्याचे तांत्रिक माहितीच्या आधारे दिसून आले.अपहृतांची सुखरूप सुटका व्हावी व आरोपी पकडले जावेत यासाठी पोलिस पथकाने कोणतीही उसंत न घेता वेगाने तपास चक्रे फिरवली. मलकापूर, अमरावती,परतवाडा,बैतूल,भोपाळ(मध्यप्रदेश),नागट,कोटा (राजस्थान)या मार्गाने ४८तासात १६००कि.मी.अंतराचा माग काढत, पाठलाग केला.
अखेरच्या टप्प्यात पोलिस स्टेशन रेल्वे कालनी (कोटा राजस्थान)यांच्या मदतीने संशयित आरोपींना नार्दन चौफुल्ली कोटा येथे मोठ्या शिताफीने व धाडसाने पकडून त्यांच्या ताब्यातील दोन्ही अपहृत व्यक्ती जयेश व हिम्मत भाई यांची सुखरूप सुटका केली. या कारवाईत आरोपी मो.जुनेद मोहम्मद इमरान वय ३० रा.अमरावती व निहार अहमद फिरोज अहमद वय २६ रा.अमरावती या दोघांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीची दोन पिस्टल किंमत ५०हजार रूपये, जीवंत काडतूस किंमत एक हजार आणखी गुन्ह्यात वापरलेली कार किंमत पाच लाख रु.असा ५लाख ५१हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही आरोपी मलकापूर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास ठाणेदार मलकापूर शहर हे करीत आहेत.