Government Directs Preparation of Fodder Security Plan Against the Backdrop of 'El Niño'
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान विभागाने २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीचे निर्देश दिले आहेत.
राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते आणि पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या दर्जेदार चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश 'महाबीज' अकोला यांना ५ मे २०२६ पूर्वी देऊन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पशुधनाची संख्या विचारात घेऊन स्वतंत्र 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या आराखड्यांतर्गत धरणांचे गाळपेरा क्षेत्र व नदीपात्रालगत चारा लागवड करणे, मुरघास प्रकल्पांना गती देणे आणि भविष्यात चारा छावण्यांची गरज भासू नये यासाठी आतापासूनच साठवणुकीचे अचूक नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
पशुसंवर्धन विभागाने या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून वैरण बियाणे वाटप, हायड्रोपोनिक चारा उत्पादन, मिनी टीएमआर आणि कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी पशुपालकांना 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने'चा लाभ घेण्याचे आणि आधुनिक तंत्रांचा वापर करून चारा साठवणूक करण्याचे आवाहन केले आहे.