बुलढाणा : राज्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. संबंधित आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आता ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३७ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. शासन निर्णयानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील नोव्हेंबर २०२५ च्या नुकसानीपोटी ३७, १४० बाधित शेतकऱ्यांसाठी ३०कोटी२०लाख२६ हजार रुपये तर जानेवारी २०२६ च्या नुकसानी पोटी ७,३५७ बाधित शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ९४ लाख ७९ हजार रुपये अशाप्रकारे जिल्ह्यासाठी एकूण ३७ कोटी १५ लाख ५हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
मदतीचा निधी 'डीबीटी' पोर्टलद्वारे थेट शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. बँकांना वसुली करण्यास मनाई: शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, नैसर्गिक आपत्तींतर्गत मिळालेली ही मदतीची रक्कम बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात किंवा इतर वसुलीसाठी वळती करू नये. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या जाणार आहेत.