Forest Department arrests murrum mafia
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : वन विभागाला तब्बल एक वर्षापासून गुंगारा देत फरार असलेल्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणातील आरोपीला अखेर बुलढाणा वन विभागाच्या अंचरवाडी बिटच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले.. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉलीही जप्त करण्यात आली असून, अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा वन विभागाच्या अंचरवाडी बिट अंतर्गत शेळगाव आटोळ परिसरात जून २०२५ मध्ये तब्बल ११२.१३ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वनरक्षक गजानन पोटे यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गणेश संपतराव गावंडे (रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली) हा मागील एक वर्षापासून फरार होता.
दरम्यान, १ जुलै २०२६ रोजी वनपाल पी. पी. मुंडे, वनरक्षक गजानन पोटे आणि अंचरवाडी बिटच्या पथकाला आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचत पथकाने मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरण्यात आलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून पुढील कारवाईसाठी लाकूड आगार डेपो बुलढाणा येथे जमा करण्यात आला.