Embezzlement of ₹2.93 Crore at Saroj Credit Society Exposed
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील - देऊळगाव मही येथील सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये तब्बल २ - कोटी ९३ लाख १ हजार ९३४ - रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणातून उघड झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी - खळबळ उडाली आहे. या प्रकरणी - संस्थेच्या व्यवस्थापक, कर्मचारी, - दैनिक ठेव एजंट, संचालक मंडळ व ₹१०० ₹५०० - कर्जदार सभासद अशा एकूण ५५ - जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या पतसंस्थेबाबत गावात व परिसरात विविध चर्चा रंगत असताना अखेर अधिकृत गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांची आयुष्यभराची बचत अडकल्याने नागरिक संतप्त झाल्याचे चित्र आहे.
विशेष लेखापरीक्षणातून धक्कादायक प्रकार उघड या प्रकरणी बुलढाणा येथील विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) कार्यालयातील ए. एम. व्यथहारे यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलढाणा यांच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यात आले होते.
लेखापरीक्षणादरम्यान संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता, नियमबाह्य व्यवहार, कर्ज वितरणातील गंभीर त्रुटी, ठेवींच्या रकमांमध्ये गैरव्यवहार तसेच आर्थिक नोंदींमध्ये विसंगती आढळून आली. त्यानंतर यासंदर्भातील विनिर्दिष्ट अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. खातेदार हवालदिल झाले आहे.
व्यवस्थापनासह कर्जदारही रडारवर
सहायक निबंधक, सहकारी संस्था देऊळगाव राजा यांच्या प्राधिकृत आदेशानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात संस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापक, कर्मचारी, दैनिक ठेव एजंट, संचालक मंडळातील पदाधिकारी तसेच काही कर्जदार सभासद यांच्या संगनमतातून हा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस तपासाला वेग
देऊळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्याकडे सोपविला आहे. पोलिसांनी संस्थेतील आर्थिक कागदपत्रे, कर्ज व्यवहार, ठेवींची नोंद, बँक व्यवहार आणि संचालक मंडळाच्या निर्णयांची छाननी सुरू केली असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे