बुलढाणा : शासनाच्या हमीभाव धान्य विक्री केंद्रावर विकलेल्या ज्वारीचे देयक लवकर अदा करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. या कारवाईनंतर महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली.
या कारवाईबाबत एसीबीच्या अधिक माहिती अशी की, बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरातील एका शेतकऱ्याने शासनाच्या हमीभाव धान्य विक्री केंद्रावर ज्वारीची विक्री केली होती. त्याचे प्रलंबित असलेले देयक लवकर मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यानी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी देवानंद खंडागळे यांच्यामार्फत संबंधित शेतकऱ्यास ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५० हजाराची लाचेची रक्कम दोन टप्प्यात घेण्याचे ठरले.
याबाबत शेतकऱ्याने एसीबी बुलढाणा कार्यालयात तक्रार दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून बुधवार २३ जुलै रोजी दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात कारवाईसाठी सापळा लावला. यावेळी ठरल्याप्रमाणे २५ हजाराची लाचेची रक्कम तक्रारदार शेतकऱ्याकडून स्विकारताना पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्याचवेळी टेकाळेचा हस्तक देवानंद खंडागळे यालाही एसीबीने ताब्यात घेतले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुंसिफे, एपीआय शाम भांगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.