दैत्यसूदन मंदिर  pudhari photo
बुलढाणा

Daityasudan Temple Lonar : दैत्यसूदन मंदिर स्थापत्यकलेचा अद्भुत वारसा

लोणार ः सूर्यकिरणांचा दिव्य सोहळ्यास सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

लोणार ः बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जागतिक कीर्ती प्राप्त खाऱ्या पाण्याचे सरोवर केवळ वैज्ञानिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळेच प्रसिद्ध नाही, तर अध्यात्म, इतिहास आणि प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत संगम असलेल्या दैत्यसूदन मंदिरामुळेही जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. 11 व्या शतकातील हे भव्य प्राचीन मंदिर चालुक्य काळात बांधण्यात आले असून, विदर्भातील स्थापत्यकलेचा सर्वोत्तम नमुना म्हणून त्याची ओळख आहे.

दरवर्षी मे महिन्यात या मंदिरात होणारा सूर्यकिरणांचा अभिषेक हा पर्यटक व भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो. मंदिराच्या स्थापत्य रचनेमुळे विशिष्ट दिवसांमध्ये सकाळचे सूर्यकिरण थेट गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडतात. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक लोणारमध्ये दाखल होतात.

यंदाही 15 मे पासून सलग पाच दिवस हा किरणोत्सव अनुभवायला मिळणार आहे.नैसर्गिकरित्या सूर्यकिरण मूर्तीच्या मस्तकावर पडून संपूर्ण मूर्ती उजळून निघते, ते दृश्य भाविकांसाठी आध्यात्मिक अनुभूती देणारे ठरते. गेल्या काही वर्षांपासून हा किरणोत्सव देश-विदेशा -तील पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकदेखील या अनोख्या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी लोणारला भेट देतात.

मंदिरावरील सूक्ष्म आणि अप्रतिम शिल्पकलेमुळे या मंदिराला “विदर्भाचे खजुराहो” असेही संबोधले जाते.हे मंदिर चालुक्य सम्राट विक्रमादित्य यांच्या काळात उभारण्यात आल्याचे मानले जाते. अनेक शतके हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. अखेर 1878 मध्ये या मंदिराचा पुन्हा शोध लागला आणि इतिहासातील एक अद्भुत वास्तू जगासमोर आली. हेमाडपंती शैलीत बांधलेले हे मंदिर बाहेरून अनियमित ताऱ्याच्या आकाराचे दिसते.

काळ्या पाषाणातून उभारलेल्या या मंदिरावर अत्यंत बारकाईने कोरलेली शिल्पकला पाहून पर्यटक थक्क होतात.दैत्यसूदन मंदिराची मुख्य देवता भगवान विष्णू असून, गर्भगृहात विष्णूने लवणासुर राक्षसाचा वध करतानाची भव्य मूर्ती आहे. शस्त्रधारी भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाखाली असलेला लवणासुर असा देखावा भाविकांना जागीच खिळवून ठेवतो. मंदिरातील मूर्तीमध्ये धातूचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते.

मूळ मूर्ती कालांतराने गायब झाली असून, सध्याची मूर्ती नागपूरच्या भोसले राजांनी स्थापित केल्याचे मानले जाते.मंदिराच्या बाह्य भिंतींवर देवदेवता, यक्ष, गंधर्व तसेच कामशिल्पांचे अप्रतिम कोरीव काम पाहायला मिळते. या शिल्पांमध्ये खजुराहो मंदिरांची झलक दिसून येते. त्यामुळेच इतिहास संशोधक आणि स्थापत्य अभ्यासकांसाठी हे मंदिर विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

प्राचीन भारतातील वैभवशाली सत्ता, प्रगत स्थापत्यशैली आणि तत्कालीन समाजजीवनाचे दर्शन या मंदिरातून घडते.दैत्यसूदन मंदिराचा लोणार सरोवराशीही घनिष्ठ संबंध आहे. पौराणिक कथेनुसार, लवणासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी याच ठिकाणी अवतार घेतला होता. त्यामुळे लोणार हे धार्मिक आणि पौराणिक दृष्ट्याही महत्त्वाचे स्थान मानले जाते.

  • वैज्ञानिक महत्त्व, ऐतिहासिक वारसा आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम असलेले लोणारचे दैत्यसूदन मंदिर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या या मंदिरातील किरणोत्सव मे महिन्यात पर्यटकांसाठी खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT