बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : नागपूरपाठोपाठ आता बुलडाणा जिल्ह्यातही अतिवृष्टीने हाहाकार उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदुरा तालुक्यातील लोणवाडी, खडदगाव, पिंपळखुटा धांडे आणि माळेगाव गोंड या गावांत ढगफुटीसद़ृश पाऊस झाला असून, त्यामुळे शेतीसोबतच शेतकर्यांना पशुधन गमवावे लागले. तब्बल 30 जनावरे या पावसात दगावली आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, नांदुरा, मोताळा या तालुक्यांत तुफान पाऊस कोसळत आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा पाऊस शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घासदेखील हिरावून घेत असल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील लोणवाडी, खडदगाव, पिंपळखुटा धांडे व माळेगाव गोंड या चार गावांत रविवारी रात्री ढगफुटीसद़ृश मुसळधार पावसामुळे शेतीचे रूपांतर तलावात झाले आहे. नदी-नाल्यांच्या काठावरील जमिनी खरवडून गेल्या असून, लोणवाडी व खडदगाव येथील जनावरे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.
मुलासाठी औषध आणण्याकरिता जाताना माटोडा येथील प्रशांत दांडगे (वय 28) हे गावलगतच्या वडी नाल्याच्या पुरातून मार्ग काढत काढताना वाहून गेल्याने त्यांचा रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.