बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: समृध्दी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) मुंबईहून अकोल्याकडे जात असलेली भरधाव कारने कठड्याला धडकून पेट घेतला. कार जळून खाक झाली. यात कारमधील दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर कार चालक गंभीर जखमी झाला. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील टोलनाक्याजवळ ही घटना आज (दि. २०) सकाळी ९ च्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ९ च्या सुमारास अकोल्याच्या दिशेने जात असलेल्या कारचा (एमएच ०४-एलबी ३१०९) चालक अभिजित अर्जुन चव्हाण (वय ३५ रा .मुंबई ) याचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार महामार्गाच्या कठड्यावर जाऊन आदळली. यावेळी कठड्याची लोखंडी पट्टी कारच्या समोरील भागातून आरपार घुसल्याने कारने पेट घेतला.
या दुर्घटनेत कारमधील गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) व राजू महंतलाल जयस्वाल ( वय ३२, रा. मुंबई) या दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. चालक अभिजित चव्हाण हा गंभीर जखमी झाल्याने त्याला बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधून मृतदेह बाहेर काढले.