Banyan Tree Worship in Dattapur
बुलढाणा: दत्तपूर मध्ये विधवांनी कुंकू लावून वटवृक्षाचे पूजन केले.  Pudhari News Network
बुलढाणा

बुलढाणा: दत्तपूरचे पुरोगामीत्व; विधवांनी लावले कुंकू अन् वटवृक्षाला घातल्या फेऱ्या

अविनाश सुतार

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: जन्मोजन्मी हाच पती मिळावा, या भावनेने वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वटवृक्षाचे पूजन करतात. आज हा उत्सव सर्वत्र साजरा झाला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला मागणे मागतात. मात्र, ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे, अशा विधवांना या समारंभापासून दूर ठेवले जाते. असे असले तरी सामाजिक चालीरीतीला फाटा देत बुलढाणा तालुक्यातील दत्तपूर गावाने सामाजिक आदर्श उभा केला. यावेळी सुवासिनींनी विधवांना कुंकू लावले, त्यांचे पूजन केले व आपल्या सोबत त्यांनाही वटसावित्री पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. सामाजिक बदलाचे पाऊल ठरणारा हा अनोखा कार्यक्रम दत्तपूरच्या मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणातील वटवृक्षाखाली आज (दि.२१) पार पडला.

मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराचा पुढाकार

दत्तपूर गाव हे आदर्श गाव मानले गेले आहे. स्वच्छतेचा आदर्श याच गावाने जिल्ह्यापुढे घालून दिला. तसा आज सामाजिक सुधारणेचा आदर्श ही इथेच पाहायला मिळाला. मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराच्या वतीने प्रा. डी एस लहाने यांनी विधवा महिलांसाठी मैलाचा दगड ठरावा, असे प्रयत्न सुरू केले आहे. प्रा. लहाने, पत्रकार गणेश निकम, प्रा. शाहिनाताई पठाण, अनिता कापरे, प्रतिभा भुतेकर, प्रज्ञा लांजेवार, गजानन मुळे, संदीप जाधव, गौरव देशमुख व काही पत्रकार आज सकाळी दत्तपूर गावात पोहोचले. यावेळी विधवा महिलांनाही कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन प्रा. लहाने यांनी ग्रामस्थांना केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दत्तपूरचे सरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांनी विधवा भगिनींना शाळेच्या पारावर एकत्रित बोलावले.

यावेळी गावातील सुवासिनी महिलांनी विधवा भगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी करून घेत त्यांना कुंकू लावले. विधवा भगिणींना कुंकू लावणे ही तर बदलाची नांदी ठरावी. पूजेचे ताट त्यांच्या हाती देत वटसावित्री पुजनाचा विधी करून घेतला. व वडाच्या झाडाला सोबतीने फे-या मारल्या. हा अनोखा कार्यक्रम घडून आला. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

शपथही घेतली

या कार्यक्रमांमध्ये नुकतच लग्न झालेल्या नवीन मुलींपासून तर वय वर्ष ७० पर्यंतच्या महिला सहभागी झाल्या. जेव्हा पूजेचे ताट विधवांच्या हातात दिले. तेव्हा अनेक विधवा भगिनींनी हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. यावेळी विधवा प्रथा न पाळण्याची शपथ वटसावित्री पौर्णिमेच्या समारंभात सहभागी झालेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी घेतली. प्रा. शहिना पठाण यांनी शपथ दिली.

सण उत्सवात त्यांनाही सहभागी करूया

एखाद्या महिलेचा पती वारला असेल तर त्यामध्ये तिचा दोष नसतो. तिचे सौंदर्य लेणे काढून तीला विद्रुप करणे आणि सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत करणे योग्य नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून विधवा महिलांनाही सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे प्रा. डी.एस. लहाने यावेळी म्हणाले.

SCROLL FOR NEXT