Buldhana Crime 
बुलढाणा

Buldhana Crime: शेतजमिनीच्या वादातून मुलाने आईसह भाऊ - पुतण्याला संपवला, बुलढाणा हादरले

शेतजमिनीच्या वाटणीवरून कौटुंबिक वाद; चाकूने सपासप वार करून तिघांचा खून

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : शेतजमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून एकाने आपल्या जन्मदात्री आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चिखली शहराजवळील सोमठाणा गावात गुरुवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे सोमठाणा परिसरात खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये सरस्वती फत्तेसिंह सुरडकर (७५), संजय फत्तेसिंह सुरडकर (५५) आणि रणजीत संजय सुरडकर (२५) यांचा समावेश आहे. हत्येनंतर संशयित आरोपी दीपक फत्तेसिंह सुरडकर फरार झाला असून, चिखली पोलिसांची विविध पथके त्याचा शोध घेत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, चिखली शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमठाणा गावातील सुरडकर कुटुंबात शेतजमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू होता. आई सरस्वती यांनी दीपकच्या हिश्श्याची शेती दुसरा मुलगा संजय याला दिल्याचा राग दीपकच्या मनात होता. याच कारणातून कुटुंबातील वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दीपकने राहत्या घरी आई सरस्वतीबाई, भाऊ संजय आणि पुतण्या रणजीत यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.

चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, संशयित आरोपी दीपक सुरडकर याचा शोध घेण्यासाठी चिखली पोलिसांची पथके रवाना झाली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT