बुलढाणा: जिल्हाधिकाऱ्यांच्या टाकलेल्या छाप्यात २३,०९० लिटर अवैध बायोडिझेल जप्त 
बुलढाणा

Biodiesel Seized |बुलढाणा: जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात २९,०३० लिटर अवैध बायोडिझेल जप्त!

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या पथकाने महामार्गावर केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : जिल्हा प्रशासनाकडून आज (दि.१५) जिल्ह्यात मलकापूर जवळ अवैध बायोडिझेल व्यवहारावर मोठी धडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या पथकाने वडनेर भोलजी–मलकापूर महामार्गावर संशयितरित्या उभ्या असलेल्या एका टॅंकरवर छापा टाकला. या कारवाईत १२ लाख ३३ हजार १९४ रुपये किमतीचे २३०९० लिटर अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले. संबंधित ट्रक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वडनेर भोलजी–मलकापूर महामार्गावर उभा असलेला टॅंकर क्रमांक जीजे०३बीडब्ल्यू३०३४ हा संशयितरित्या आढळून आला होता. या टॅंकरचा चालक सहदेव याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यावर संशय बळावल्याने टॅंकरवर छापा टाकण्यात आला. हे बेकायदेशीर बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन, पणोली, अंकलेश्वर, जिल्हा भरूच (गुजरात) येथून बापा सीताराम ट्रेडिंग, वाघुड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथे पाठविण्यात येत होते. गोपनीय माहितीच्या आधारावर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणात संबंधितांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार राहुल तायडे, पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांनी केली असून गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे. अवैध बायोडिझेल विक्री, वाहतूक व साठा प्रकरणी पुढील तपास जिल्हा प्रशासन व पोलिस निरीक्षक गणेश गिरी करत आहेत.

जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल व्यवहार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. यात गुंतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच कुठेही अवैध बायोडिझेल व्यवहार व वापर होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT