बुलढाणा : जिल्ह्यातील नांदूरा-खामगांव राष्ट्रीय महामार्गावर लांजूड फाट्यावर नाकाबंदी करुन जलंब पोलिसांनी एका ट्रकमधून २३ लाख ६८ हजाराचा ५० पोते प्रबंधित गुटखा व सुगंधी पानमसाला जप्त केला. या कारवाईत मध्यप्रदेशातील तीन गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातून ट्रकद्वारे प्रतिबंधित विमल गुटखा व सुगंधित पानसुपारीची नांदूरा - खामगाव राष्ट्रीय महामार्गावर चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून जलंब पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल सांगळे व त्यांच्या सहकारी पोलीस पथकाने लांजूड फाट्यावर नाकाबंदी करुन संशयित ट्रक(क्र.एमएच१९-एफ ९९९४) अडवून त्याची झाडाझडती घेतली असती त्यात ५०पोत्यात दडवलेला विमल गुटखा व सुगंधित पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.
याची किंमत २३ लाख ६८ हजार ८० रु.आहे. तसेच अवैध गुटखा वाहतूक करीत असलेला १५ लाख रु.चा ट्रकही जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपी अमीर खान (वय ३४,)रा.इंदौर, गोवर्धन माताराणी सेन (वय ३२ ) रा.उज्जैन हरिकिसन राधेश्याम पांचाल (वय ३३) रा.उज्जैन मध्यप्रदेश या तीन गुटखा तस्करांना भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.