बुलडाणा: बुलडाणा शहरातील एका नामांकित विद्यालयात आठव्या वर्गात शिकणा-या दोन वर्ग मित्रांनी राहत्या घरात छताला गळफास घेऊन अकालीच आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनांनी पालकवर्गाला प्रचंड धक्का बसला आहे.अवघ्या चौदा वर्षे वयाच्या दोन विद्यार्थ्यांनी लागोपाठ दोन दिवसांच्या अंतराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक क्षेत्रही चिंतित झाले आहे.
शहरातील भारत विद्यालयात आठव्या वर्गात शिकणा-या नमन अरुण राऊत या विद्यार्थ्याने शिक्षक व शिक्षिका असलेले त्याचे आईवडील हे कर्तव्यावर बाहेरगावी गेले असतांना बुधवार दि.११च्या सकाळी १० वाजता छत्रपती नगरातील आपल्या राहत्या घरी अभ्यास कक्षाच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्या दुःखद घटनेच्या पाठोपाठ आज शनिवार दि.१४च्या सायंकाळी ५ वाजता मृत नमन राऊत या विद्यार्थ्याचा वर्गमित्र अथर्व वैभव राणे याने शाळेतून परतल्यानंतर सुंदरखेड परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.वैभवचे वडील कारागृह पोलीस आहेत. बुलडाण्यातील अल्पवयीन वर्गमित्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी पालकवर्गाला प्रचंड धक्का बसला आहे. या अनाकलनीय घटनांमागील कारण शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.